देता की जाता? धनगर समाजाचा इशारा, भाजप-शिवसेनेच्या वचननाम्याची होळी

Foto

औरंगाबाद- धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप-शिवसेनेचे सरकार वेळकाढूपणा करत असल्याने समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. आज सोमवारी फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातर्फे शिवसेना-भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या वचननाम्याची जाहीररीत्या होळी करण्यात आली. देता की जाता? असा इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला.

 

आळंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी ( डिसेंबर) धनगर समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करून तात्काळ आरक्षण द्यावे, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच शिवसेना-भाजपच्या वचननाम्याची जाहीर होळी करण्यात आली. यावेळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष रामदास गायके, धनगर आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास गायके, फुलंब्री तालुकाध्यक्ष बाबासाहेब गायके, ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ गायके, गोपीनाथ खिल्‍लारे, रावसाहेब खिल्‍लारे, भाऊसाहेब गायके, गंपू गायके यांच्यासह अनेक धनगर समाजबांधव उपस्थित होते. 

 

धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब समाजबांधवांचा संयमाचा अंत पाहणारा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्‍वासन दिले. त्यानंतरही वारंवार आरक्षण देऊ, असेच सांगितले;पण आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. धनगर आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करणार्‍या या सरकारने आता तर पुढील अधिवेशनापर्यंत हा विषय पुढे ढकलला आहे. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा धनगर समाजाकडून याप्रसंगी देण्यात आला.